पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम मंडळाला शासनाची मंजुरी

सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोकण प्रादेशिक विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. यापैकी पालघर वगळता इतर सर्व जिल्ह्यांसाठी स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालये अस्तित्वात आहेत.
पालघर जिल्ह्याची निर्मिती २०१४ मध्ये झाली. मात्र, पालघर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यक्षेत्र अद्याप ठाणे सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अखत्यारित होते. त्यामुळे जिल्ह्याच्या विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्रामुळे आणि वाढलेल्या विकासकामांमुळे ठाणे कार्यालयावर कामाचा अतिरिक्त भार पडत होता.
दरम्यान, पालघर जिल्ह्यात विविध राष्ट्रीय प्रकल्पांची कामे सुरू असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम मंडळ स्थापन करण्याची मागणी लोकप्रतिनिधी तसेच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली होती.
१० ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, पालघर जिल्ह्यासाठी नवीन सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालय स्थापन करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या कार्यालयाला ‘अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, पालघर’ असे नाव देण्यात आले आहे.
या निर्णयामुळे पालघर जिल्ह्यातील नागरिकांना विविध सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित कामांसाठी ठाणे येथे जाण्याची गरज कमी होणार आहे. जिल्हा मुख्यालयाच्या परिसरातच मंडळ कार्यालय उपलब्ध झाल्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांसाठी प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
तसेच पालघर जिल्ह्यात, विशेषतः आदिवासी भवन परिसरासह विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांवर देखरेख आणि नियंत्रण ठेवणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सोपे होणार आहे. जिल्ह्यातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
पालघर मंडळाअंतर्गत कोणते विभाग?
नवीन पालघर सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पालघर, जव्हार आणि कोकण भवन येथील आदिवासी विभागाचा समावेश करण्यात आला आहे. या प्रत्येक विभागीय कार्यालयाअंतर्गत उपविभागांची निश्चिती यापूर्वीच करण्यात आली आहे.
नवीन मंडळ कार्यालयासाठी पदांना मंजुरी
नवीन मंडळ कार्यालयाच्या कामकाजासाठी विविध पदांनाही शासनाने मंजुरी दिली आहे. यामध्ये अधीक्षक अभियंता, एक उपअभियंता आणि दोन कनिष्ठ/शाखा अभियंता यांच्या पदांचा समावेश आहे.
याशिवाय उच्च श्रेणी लघुलेखक, प्रमुख आरेखक, अधीक्षक, प्रथम लिपिक, सहाय्यक आरेखक आणि नाईक या पदांनाही मंजुरी देण्यात आली आहे.
वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक यांच्यासाठी प्रत्येकी चार पदे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच बाह्य यंत्रणेमार्फत एक वाहनचालक, एक चौकीदार आणि चार शिपाई उपलब्ध करून देण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम मंडळ स्थापन झाल्यामुळे जिल्ह्यातील रस्ते, पूल, शासकीय इमारती आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांवर अधिक प्रभावीपणे देखरेख ठेवता येणार आहे. त्यामुळे वाढत्या राष्ट्रीय आणि स्थानिक प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर पालघरच्या पायाभूत विकासाला या निर्णयामुळे चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

