तलासरीत १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचाराचा आरोप; तीन संशयित ताब्यात

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी पीडित तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत होती. गुजरातहून परतताना तलासरी परिसरात त्यांची मोटरसायकल रस्त्यावर पडली. त्यावेळी दोन मोटरसायकलींवर काही तरुण तेथे उपस्थित होते. याच परिस्थितीचा फायदा घेत तरुणीला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून तलासरीतील डाक बंगला परिसरातील निर्जन ठिकाणी नेल्याचा आरोप आहे.
तेथे तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. घटनेनंतर तिने पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच तलासरी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. एक संशयित सोमवारी, तर अन्य दोन संशयित मंगळवारी पोलिसांच्या ताब्यात आले. पीडितेने सहा जणांची नावे पोलिसांना सांगितल्याची माहिती असून, त्यापैकी पाच जणांचा घटनेत सहभाग असल्याचा प्राथमिक संशय आहे.
या प्रकरणात नितेश गांगड याचे नाव संशयित म्हणून समोर आले आहे. मात्र, प्रत्येक संशयिताचा नेमका सहभाग तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
घटनेच्या वेळी पीडितेसोबत असलेला तिचा प्रियकर भीतीने घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती आहे. त्यानंतर तो स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला आणि त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली.
दरम्यान, पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तलासरी येथे भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. उर्वरित संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून, प्रकरणातील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या घटनेमुळे तलासरी परिसरातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, निर्जन परिसरात पोलिसांची गस्त आणि सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची मागणी होत आहे.

