विरार–डहाणू चौपदरीकरणावर प्रश्नचिन्ह; ₹२,६९७ कोटी खर्च, तरी प्रकल्पाची अंतिम तारीख स्पष्ट नाही

या प्रकल्पातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे विरार ते डहाणू दरम्यान नव्या रेल्वेमार्गांवरील फलाटांच्या बांधकामाची सुरुवात आणि पूर्णत्वाची तारीखच उपलब्ध नसल्याचे एमआरव्हीसीने माहिती अधिकाराच्या अर्जाला दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले आहे. त्यामुळे हजारो कोटी रुपये खर्च झाल्यानंतरही प्रकल्पातील महत्त्वाच्या कामांचे वेळापत्रक निश्चित नसल्याने प्रवासी संघटनांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
९१ पुलांपैकी ७० पूर्ण; २१ पुलांचे काम अद्याप बाकी
विरार–डहाणू चौपदरीकरणासाठी नव्या रेल्वेमार्गांवर एकूण ९१ पूल प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यापैकी ७० पुलांचे काम पूर्ण झाले असून अद्याप २१ पुलांची कामे प्रलंबित आहेत.
एकीकडे पूल, भूसंपादन, नवीन रेल्वेमार्ग आणि इतर पायाभूत सुविधांची कामे सुरू असताना प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. मात्र, मंजूर निधीपैकी जवळपास तीन चतुर्थांश निधी खर्च झाल्यानंतरही संपूर्ण प्रकल्प कधी कार्यान्वित होणार, याबाबत निश्चित माहिती समोर आलेली नाही.
फलाट कधी बांधणार? एमआरव्हीसीकडेही माहिती नाही!
आरटीआय अर्जामध्ये विरार ते डहाणू दरम्यान नव्या रेल्वेमार्गांवरील फलाटांच्या बांधकामाची सुरुवात कधी झाली आणि ते काम कधी पूर्ण होणार, याबाबत माहिती मागवण्यात आली होती. मात्र एमआरव्हीसीने यावर “Information not available” असे उत्तर दिले.
चौपदरीकरणानंतर नव्या मार्गांवर रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी फलाट आणि प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अशा परिस्थितीत फलाटांच्या कामाचे निश्चित वेळापत्रकच उपलब्ध नसल्याने प्रकल्पाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मार्च २०२३ ची मुदत उलटली; आता आणखी किती प्रतीक्षा?
उपलब्ध माहितीनुसार, विरार–डहाणू चौपदरीकरण प्रकल्प मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र ही मूळ मुदत केव्हाच उलटून गेली आहे. त्यानंतर प्रकल्पाची मुदत वाढत गेली असून, यापूर्वी प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी काही वर्षांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती समोर आली होती.
आता नव्या आरटीआयमधून २१ पूल अपूर्ण असल्याचे आणि फलाटांच्या बांधकामाचे वेळापत्रकही उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष पूर्णत्वाबाबतचा संभ्रम आणखी वाढला आहे.
लाखो प्रवाशांना दिलासा कधी?
विरार–डहाणू रेल्वे मार्गावर दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत असून सध्याच्या रेल्वे व्यवस्थेवर मोठा ताण आहे. चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर रेल्वे वाहतुकीचे नियोजन अधिक सक्षम होण्याबरोबरच अतिरिक्त लोकल सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा आहे.
त्यामुळे पालघर जिल्ह्यातील लाखो प्रवाशांसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र २,६९७ कोटी रुपयांहून अधिक खर्च झाल्यानंतरही प्रकल्पाच्या महत्त्वाच्या कामांच्या पूर्णत्वाच्या तारखा स्पष्ट नसतील, तर उर्वरित कामे नेमकी कधी पूर्ण होणार? असा सवाल प्रवासी संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.
“मार्च २०२३ ची मूळ अपेक्षित मुदत केव्हाच उलटली. खर्च २,६९७ कोटींच्या पुढे गेला. तरीही चौपदरीकरणाची अंतिम गाडी नेमकी कधी रुळावर येणार, याचे उत्तर अद्याप प्रतीक्षेतच आहे. खर्चाची आकडेवारी आहे; मग कामाच्या तारखा का नाहीत?”
— हितेश सावे, जनसंपर्क अधिकारी, डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था

