डहाणू नगराध्यक्ष राजेंद्र माच्छी यांची प्रकृती खालावली; उपचारासाठी ठाण्यात दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, डहाणूमध्ये उपचारासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याने माच्छी यांना ठाणे येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे डहाणूतील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
पूरपरिस्थितीच्या काळात नागरिकांना मदत करण्यासाठी राजेंद्र माच्छी यांनी स्वतः मैदानात उतरून काम केले होते. या काळात नागरिकांच्या मदतीसाठी सातत्याने धावपळ केल्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे लोकाभिमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सल्ल्यानुसार राजेंद्र माच्छी यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सहकारी अडचणीत असताना त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात आले.
राजेंद्र माच्छी यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, या घटनेच्या निमित्ताने डहाणूसारख्या तालुक्याच्या ठिकाणी नागरिकांना तसेच लोकप्रतिनिधींना आवश्यक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध आहेत का? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
डहाणू हा पालघर जिल्ह्यातील मोठा तालुका असून त्याचा भौगोलिक भाग डोंगराळ आणि सागरी स्वरूपाचा आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक पातळीवर सक्षम आरोग्य सुविधा असणे महत्त्वाचे मानले जाते.

