BOISAR | लाल बावट्याच्या बिर्हाड आंदोलनाला यश – प्रलंबित वनदावे निकाली, मध्यरात्री आंदोलन स्थगित

बोईसर : प्रलंबित वनहक्क दाव्यांच्या मागणीसाठी माक्सवादी-लेनिनवादी लाल बावटा पक्षाने 25 जूनपासून बोईसर वनविभाग कार्यालयावर बेमुदत बिर्हाड आंदोलन सुरू केले होते. भर पावसात देखील आदिवासी बांधवांनी स्वयंपाकाच्या चुली पेटवत, डोक्यावर लाकडांचे भारे व तांदूळ-कांदा-बटाटा घेऊन शिस्तबद्ध रॅलीने आंदोलनाची सुरुवात केली.

आंदोलनाची तीव्रता वाढताच पोलीस व वनविभागाची धांदल उडाली. राज्य सचिव काॅ. आदेश बनसोडे, जिल्हा सह सचिव काॅ. शेरू वाघ, तालुका सचिव काॅ. भगवाण म्हणणे आदींच्या आक्रमक भाषणांनी प्रशासनाला धारेवर धरले. महिलांनी आंदोलनपर गाणी सादर करत उत्साह वाढवला.

प्रशासनाने दोन दिवसांत वनदावे निकाली काढण्याचे आश्वासन दिले. मात्र, लाल बावटा पक्षाने “आश्वासन नव्हे, अमलबजावणी हवी” असा ठाम पवित्रा घेतल्यानंतर अखेर प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली.

मध्यरात्री सर्व दावे प्रांत कार्यालयात दाखल झाल्यानंतर आंदोलन यशस्वी ठरले व ते स्थगित करण्यात आले. बोईसर पोलीस निरीक्षक पवार यांचे आंदोलनकर्त्यांनी विशेष आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *