सरावली संजय नगर येथे नवीन अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन

सरावली ग्रामपंचायत हद्दीतील संजय नगर येथे नवीन अंगणवाडी इमारतीचा भूमिपूजन समारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य पूर्णिमा धोडी, सरपंच आनंद धोडी आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडला. पालघर जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत सरावली ग्रामपंचायत हद्दीतील संजय नगर आणि सिद्धार्थनगर येथे दोन नवीन अंगणवाडी इमारती मंजूर करण्यात आल्या आहेत. नवीन अंगणवाडी इमारतींमुळे भाडेतत्त्वावरील धोकादायक इमारतीमध्ये भीतीच्या छायेखाली शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील काळात सुरक्षितपणे शिक्षण घेता येणार आहे.

सरावली ग्रामपंचायत हद्दीमध्ये सरकारी जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे नवीन अंगणवाडी इमारत बांधकामासाठी योग्य जागा मिळत नव्हती. मात्र जिल्हा परिषद सदस्य पूर्णिमा धोडी यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून संजय नगर आणि सिद्धार्थ नगर येथे अंगणवाडी इमारत बांधण्यासाठी प्रत्येकी एक- एक गुंठे सरकारी जागा मंजूर करून घेतली. त्याचप्रमाणे संजय नगर येथे अंगणवाडी इमारतीसाठी १० लाख ६५ हजार रुपये आणि सिद्धार्थ नगर अंगणवाडी इमारतीसाठी १० लाख ६८ हजार रुपयांचा निधीला जिल्हा परिषदेकडून प्रशासकीय मान्यता मिळवली.
१० डिसेंबर रोजी संजय नगर येथील नवीन अंगणवाडी इमारत बांधकामाचा माजी जिल्हा परिषद सदस्य पूर्णिमा धोडी, सरपंच आनंद धोडी, ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले असून लवकरच अंगणवाडी बांधकामाला सुरुवात होणार आहे.

