पालघरच्या आश्रम शाळेत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; झोपेत असताना विद्यार्थ्याचे केस व भुवया कापल्या

पालघर जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मोखाडा तालुक्यातील चास येथील आदिवासी आश्रम शाळेत एका अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत रॅगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. झोपेत असताना त्या विद्यार्थ्याच्या डोक्यावरील केस तसेच भुवयांचे केस कापण्यात आल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर आश्रम शाळेत आठवीत शिक्षण घेणारा 14 वर्षीय विद्यार्थी रात्री वसतिगृहात झोपलेला असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्या डोक्यावरील केस कापले. इतकेच नव्हे तर डोळ्यावरील भुवयांचे केसही कापण्यात आले. या प्रकारात विद्यार्थ्याच्या डोक्याला जखम झाल्याचेही समोर आले आहे.
सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर विद्यार्थी मानसिक धक्क्यात सापडला असून पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शाळेतील देखरेख व्यवस्था, वसतिगृहातील सुरक्षा आणि जबाबदार कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
पालकांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणी संबंधित विभाग आणि शाळा प्रशासनाकडून नेमकी काय कारवाई होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

