पालघर|सोशल मीडियावर ज्येष्ठ पत्रकारांची बदनामी प्रकरणी कारवाई संदर्भात: पत्रकारांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

पालघर जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियातील पत्रकारांनी एकत्र येत सोशल मीडियावर ज्येष्ठ पत्रकारांची बदनामी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात पत्रकारांनी मा. पोलीस अधीक्षक, पालघर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली.
पत्रकारांच्या तक्रारीनुसार, आत्मनिर्भर भारतच्या “सारथी” या योजनेअंतर्गत पत्रकारांचा लखनऊ–कानपूर येथील अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस प्रकल्पाला अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यानंतर बोईसर येथे राहणाऱ्या गजानन मोहिते याने “बोईसर तारापूर मित्र” या फेसबुक पेजवर एक पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये दौऱ्यात सहभागी झालेल्या ज्येष्ठ पत्रकारांविषयी खोटे, निराधार आणि बदनामीकारक आरोप करण्यात आले. त्याचबरोबर काहींनी ही पोस्ट इतर सोशल मीडिया व्हाट्सअप ग्रुप वरती व्हायरल करून बदनामी केली आहे अश्यांवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार, ही पोस्ट केवळ गजानन मोहितेपुरती मर्यादित राहिली नसून विजय वझे यानेही तीच पोस्ट विविध सोशल मीडिया ग्रुपमध्ये फॉरवर्ड करून बदनामीचा प्रसार अधिक व्यापक केला. त्यामुळे पत्रकार बांधवांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या कृतीमुळे पत्रकारांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचली असून त्यांचा व्यावसायिक सन्मान आणि वैयक्तिक आयुष्य धोक्यात आले आहे.
पत्रकारांच्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे की, संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहितेतील अब्रूनुकसानाशी संबंधित कलमे व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच बदनामीकारक पोस्टची प्रतही तक्रारीसोबत जोडलेली आहे.
पत्रावर पालघर जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन तसेच नामांकित वृत्तपत्राच्या डहाणू प्रतिनिधींनी स्वाक्षऱ्या करून आपला पाठिंबा नोंदवला आहे.
या घटनेमुळे पत्रकार वर्तुळात प्रचंड नाराजी व्यक्त होत असून, “माध्यम स्वातंत्र्यावर गदा आणणारे असे प्रकार अजिबात सहन केले जाणार नाहीत” असा इशारा पत्रकारांनी दिला आहे.

