साधू हत्याकांडानंतर चर्चेत आलेले काशिनाथ चौधरी पुन्हा अडचणीत; हिंसाचाराचा गुन्हा दाखल

पालघर | प्रतिनिधी
साधू हत्याकांड प्रकरणानंतर राज्यभर चर्चेत आलेले काशिनाथ गोविंद चौधरी यांच्याविरोधात कासा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डहाणू तालुक्यातील मोडगाव सावरपाडा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या वादातून ही हिंसक घटना घडली
आता त्यांच्यावर थेट मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मोडगाव सावरपाडा येथील क्रिकेट मैदानाशेजारी घडली. येथे सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेदरम्यान सखाराम मिसाळ आणि अरुण मिसाळ यांनी चहा, वडापाव व थंड पेयांचा स्टॉल उभारला होता. यावेळी अजय रत्ना सावर आणि त्यांचे भाऊ राहुल सावर हे तेथे उपस्थित होते.
दरम्यान, काशिनाथ गोविंद चौधरी, शैलेष भिवा सांबर, जयवंत गोविंद भुरभुरे आणि वसंत पांडु चौधरी हे चौघे घटनास्थळी आले. “तुम्ही इथे स्टॉल कसा लावला?” असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात झाली. स्टॉल इतरांनीही लावले असल्याचे सांगितल्यानंतर वाद चिघळला आणि थेट मारहाण झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
बांबूच्या दांडक्याने मारहाण
फिर्यादी अजय सावर यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी जयवंत भुरभुरे आणि काशिनाथ चौधरी यांनी लाकडी बांबूच्या दांडक्याने त्यांच्या डाव्या हातावर, पायावर आणि पाठीवर जोरदार मारहाण केली. इतर आरोपींनीही हाताने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या मारहाणीत अजय सावर (वय २७, व्यवसाय – ड्रायव्हर, रा. मोडगाव आवारपाडा) जखमी झाले असून त्यांच्यावर कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. या झटापटीत सखाराम मिसाळ यांनाही दुखापत झाल्याची माहिती आहे.
गुन्हा दाखल, तपास सुरू
उपचारानंतर अजय सावर यांनी कासा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक १७२/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमान्वये चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास कासा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार काटेला करत असून, पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे.

