जव्हार पीडब्ल्यूडी बनावट धनादेश प्रकरणात आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी

दि. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी पीडब्ल्यूडी जव्हार कार्यालयाच्या नावाने काढण्यात आलेल्या धनादेश क्रमांक ०६९२१८ वर लेखा अधिकारी व कार्यकारी अभियंता यांच्या बनावट सह्या असल्याचे निष्पन्न झाले. सदर धनादेशावर तब्बल १ कोटी ११ लाख ६३ हजार ८१० रुपये इतकी रक्कम नमूद होती. हा धनादेश स्टेट बँक ऑफ इंडिया, जव्हार शाखेत आरोपी यज्ञेश अंभिरे याने वटविण्यासाठी सादर केला होता.
यानंतर ओवी कन्स्ट्रक्शनचे मालक निलेश पडवळे यांनी देखील रक्कम वटविण्याचा प्रयत्न केला. मात्र हा धनादेश सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वितरितच न झाल्याचे उघड झाल्याने प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कार्यकारी अभियंता नितीन भोये यांच्या फिर्यादीवरून जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्यात आरोपी निलेश रमेश पडवळे आणि यज्ञेश दिनकर अंभिरे यांना २९ नोव्हेंबर २०२५ रोजी अटक करण्यात आली होती. सुरुवातीला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर ते जामिनावर मुक्त झाले होते. मात्र तपास अपूर्ण असल्याने आर्थिक गुन्हे शाखा, पालघर यांनी पुन्हा पोलीस कोठडीसाठी न्यायालयात धाव घेतली.
प्रथम अपर जिल्हा व सत्र न्यायालय, भिवंडी तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपींना जव्हार न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, जव्हार यांनी आरोपींना २९ डिसेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिरीष पवार, आर्थिक गुन्हे शाखा, पालघर करीत आहेत.

