लघुउद्योगातून कष्टाने कमावलेल्या मालमत्तेचे सोनेरुपी प्रतीक अनधिकृत सावकारांचे आकाश करतय गिळंकृत

या प्रकरणी वाणगाव पोलीस ठाण्यात पाच खाजगी सावकारांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिंचणी आणि तारापूर परिसरात डाय मेकिंग, शेती, बागायतीसह विविध लघुउद्योग करणाऱ्या व्यावसायिकांना व्यवसायासाठी भांडवलाची गरज भासते. मात्र बँकांच्या जाचक अटी आणि कागदपत्रांच्या अडचणींमुळे अनेकांना नाईलाजाने अवैध सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते.
याच गरजेचा गैरफायदा घेत हे सावकार मासिक १५ ते २० टक्के चक्रवाढ व्याज आकारून कर्जदारांची अक्षरशः पिळवणूक करत असल्याचे समोर येत आहे.
हप्ता भरण्यास उशीर झाल्यास गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींमार्फत धमक्या, मानसिक त्रास, सार्वजनिक ठिकाणी अपमान आणि कुटुंबावर दबाव टाकण्याचे प्रकार घडत आहेत. परिणामी अनेक लघुउद्योजक आणि शेतकरी मूळ रकमेपेक्षा कित्येक पटीने जास्त व्याज भरूनही कर्जमुक्त होऊ शकत नाहीत.
चिंचणी–तारापूर परिसरात कष्टाने उभारलेली मालमत्ता, सोने आणि वाहने अवैध सावकारांच्या घशात जात असल्याचे भीषण वास्तव समोर येत असून, विनापरवाना सावकारीचा धंदा खुलेआम सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
दरम्यान, पालघर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले असून अवैध सावकारांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
तसेच सावकारीच्या जाचाने त्रस्त असलेल्या नागरिकांनी कोणतेही टोकाचे पाऊल न उचलता थेट सहाय्यक निबंधक कार्यालय किंवा पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

