अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर पालघर पोलिसांची कारवाई; तब्बल ३२.९६ लाखांचा मुद्देमाल जप्त

दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार लाल रंगाचा आयसर टेम्पो (क्र. MH10-DT-6633) तलासरी परिसरात येणार असल्याचे समजले. या माहितीवर आधारित सापळा रचून मौजे तलासरी ईभाडपाडा येथील सूत्रकार ओव्हरब्रिजजवळ वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली. यावेळी संशयास्पद टेम्पो पोलिसांच्या हाती लागला.
चालक बाळू किसन गंगावणे (५०, रा. मिरज, सांगली) व त्याचा साथीदार राजू संजय कांचळे (२७, रा. मिरज, सांगली) यांनी वाहनात कोल्हापूर येथील कंपन्यांचा माल असल्याचे सांगितले. मात्र तपासणीदरम्यान टेम्पोत महाराष्ट्रात बंदी असलेला तब्बल २०,९६,५५० रुपये किमतीचा सुगंधीत तंबाखू सापडला. टेम्पोसह एकूण ३२.९६ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोउपनि अमोल चिथे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ही कारवाई पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री. विनायक नरळे व डहाणू विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोनि प्रदीप पाटील (स्थानिक गुन्हे शाखा), पोनि अजय गोरड (तलासरी), तसेच इतर पोलीस कर्मचारी सहभागी होते.

