वाढवण बंदर प्रकल्प : मच्छीमार सर्वेक्षण अत्यावश्यक – जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड

पालघर | प्रतिनिधी
प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांचे सामाजिक, आर्थिक आणि उपजीविकेच्या दृष्टीने सर्वेक्षण होणे अत्यंत आवश्यक आहे, असे स्पष्ट मत जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी व्यक्त केले.
वाढवण बंदर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मच्छीमारांच्या सर्वेक्षणासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मच्छीमार सर्वेक्षणाचे महत्त्व, त्याची गरज आणि धोरणात्मक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपजिल्हाधिकारी तेजस चव्हाण, महेश सागर, जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीचे सल्लागार राजीव सिन्हा, सहाय्यक आयुक्त (मत्स्यव्यवसाय) ठाणे–पालघर, तसेच विविध संबंधित विभागांचे अधिकारी, बाधित क्षेत्रातील मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी आणि मच्छीमार संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड म्हणाल्या की,
“प्रस्तावित वाढवण बंदर परिसरातील मच्छीमारांच्या वास्तव परिस्थितीची अचूक नोंद होणे अत्यावश्यक आहे. त्यांच्या हक्कांवर, उपजीविकेवर आणि सामाजिक-आर्थिक जीवनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करूनच भविष्यात योग्य धोरणात्मक निर्णय घेता येतील.”
बैठकीदरम्यान बाधित क्षेत्रातील मच्छीमार संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली मते मांडत सखोल चर्चा केली. मच्छीमारांचे सर्वेक्षण कशा पद्धतीने करावे, सर्वेक्षण धोरण कसे असावे, याबाबत विविध मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात आला.
दरम्यान, जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक सर्वेक्षणाची सविस्तर माहिती देत संपूर्ण प्रक्रियेची रूपरेषा स्पष्ट केली.
बैठकीच्या शेवटी, बाधित क्षेत्रातील मच्छीमार संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींनी सध्या बाधित होणाऱ्या १६ गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर इतर मच्छीमारांचाही समावेश करण्यात यावा, अशी ठाम मागणी केली. तसेच JNPA मार्फत करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणास पूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *