Boisar News | भिमनगरमध्ये अपघातांना आळा घालण्यासाठी अखेर गतिरोधक; रितेश भोणे यांच्या पाठपुराव्याला यश

बोईसर : बोईसर-तारापूर या वर्दळीच्या मुख्य मार्गावरील भिमनगर परिसरात वारंवार होणारे अपघात आणि भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे निर्माण होणारा धोका लक्षात घेता अखेर या ठिकाणी स्पीड ब्रेकर (गतिरोधक) बसविण्यात आला आहे.

भिमनगर परिसरात शाळा असल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला होता. भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे शाळकरी मुले, पादचारी तसेच स्थानिक नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता होती.

ही गंभीर बाब लक्षात घेऊन कु. रितेश कमलाकर भोणे यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. तसेच प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कामाचा पाठपुरावा केल्याने अखेर शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी भिमनगर येथे गतिरोधक बसविण्याचे काम पूर्ण झाले.

गतिरोधकामुळे या मार्गावरील भरधाव वाहनांच्या वेगावर नियंत्रण येण्यास मदत होणार असून, संभाव्य अपघातांना आळा बसण्याची अपेक्षा आहे. विशेषतः शाळेच्या परिसरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल रितेश कमलाकर भोणे यांचे नागरिकांकडून अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहेत. तसेच तातडीने कार्यवाही केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचेही आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *