शेतकऱ्यांच्या मदतीला बोईसर नवरंगचा पुढाकार
आपत्तीमध्येही समाजसेवेची नवरंगची ओळख

समितीने अतिवृष्टीग्रस्त सात जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी १ लाख रुपयांची मदत जाहीर केली. ही रक्कम बुधवार, दि. १ ऑक्टोबर २०२५ रोजी पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. समितीच्या सदस्यांनी एकत्र येऊन हा निधी उभारला असून, २२ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत हा निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.
दरम्यान, पावसामुळे जिल्ह्यातील रस्ते व वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. पायाभूत सुविधा, सार्वजनिक मालमत्ता आणि खाजगी घरे यांचे प्रचंड नुकसान झाले असून स्थानिक प्रशासन मदतकार्य वेगाने राबवत आहे. गरजूंपर्यंत तातडीने सहाय्य पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
समितीचे प्रतिपादन
या संदर्भात समितीचे प्रतिनिधी निलम संखे म्हणाले, “आम्ही केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांपुरतेच मर्यादित न राहता, गरज पडल्यास समाजाच्या मदतीसाठीही पुढे सरसावतो. या कठीण प्रसंगी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही आमची जबाबदारी आहे.”
तर प्रभाकर राऊळ – प्रतिनिधी, बोईसर नवरंग यांनी सांगितले की, “महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी पूरग्रस्त स्थिती उद्भवलेली आहे, त्याठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी आम्ही मदतकार्याच्या स्वरूपात सहकार्य करू. शेतकरी व सामान्य जनतेला मदतीचा हात देणे हीच खरी समाजसेवा आहे.”
जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत
जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी समितीच्या या पुढाकाराचे स्वागत करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
उपस्थित मान्यवर
धनादेश सुपूर्द करताना नवरंग समितीचे प्रभाकर राऊळ, निलम संखे, अशोक वडे, चंद्रकांत जाधव, संजय पाटील, मुकेश पाटील, समीर मोरे, सचिन लोखंडे, जनार्दन चांदणे, अतुल देसाई व अल्पेश मोरे उपस्थित होते.
सर्वत्र कौतुक
बोईसर नवरंग समितीच्या या सामाजिक पुढाकाराचे सर्वत्र स्वागत होत असून इतर सामाजिक संस्थांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनानेही समितीच्या कार्यात सहकार्य व्यक्त केले आहे.

