बोईसरच्या पदापथावर फेरीवाल्यांची पुन्हा घुसखोरी
फेरीवाल्यांच्या मुजोरीसमोर ग्रामपंचायत प्रशासन हतबल

बोईसर मधील तारापूर आणि पालघर या मुख्य रस्त्यांच्या बाजूला नागरिकांना सुलभपणे चालण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत जवळपास ४० लाख रुपये खर्च करून नवीन पदपथ बांधण्यात आले आहेत. ग्रामपंचायत इमारत ते नवापूर नाका आणि हार्मोनी इमारतीपर्यंत नवीन पदपथ तयार करण्यात आले असून फेरीवाले आणि वाहने यांनी अतिक्रमण करू नये म्हणून लोखंडी रेलिंग लावण्यात आले आहे. नवीन पदपथ निर्मितीनंतर काही दिवस नागरिकांना सुलभपणे ये जा करता येत होती. मात्र दिवाळीनिमित्त दुकानदार, फेरीवाले, हातगाडी यांनी कपडे, दिवे, आकाश कंदील, रांगोळी, भांडी, खाद्यपदार्थ, इलेक्ट्रॉनिक वस्तू, भाजी, फळे विक्रीची दुकाने मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा आणि पदपथावर देखील बेकायदेशीरपणे थाटून अतिक्रमण केले आहे. फेरीवाल्यांच्या पदपथावरील अतिक्रमणामुळे नागरिकांवर रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीतून वाट काढण्याची वेळ आली आहे. बोईसर ग्रामपंचायती मार्फत मुख्य रस्ते आणि पदापथांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर अनेक वेळा कारवाई केल्यानंतर देखील फेरीवाले काही दिवसांत पुन्हा त्याच ठिकाणी आपले बस्तान बसवत असल्याने ग्रामपंचायत प्रशासन फेरीवाल्यांच्या मुजोरीपुढे हतबल झाल्याचे पहावयास मिळत आहे.
कोट :
बोईसर ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना ये जा करण्यासाठी नव्याने पदपथ बनविण्यात आले आहेत. मात्र काही फेरीवाल्यांकडून पदपथावर बेकायदा अतिक्रमण करण्यात आले आहे. याविरोधात पुढील काही दिवसात पोलिस प्रशासन आणि ग्रामपंचायत विभाग संयुक्त कारवाई करणार आहे.
कमलेश संखे
ग्रामविकास अधिकारी
——-

