पालघर पोलीस दलाकडून “महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन” उत्साहात साजरा

पालघर | प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलीस दलाच्या शौर्य, कर्तव्यनिष्ठा व जनसेवेचा गौरव करणारा “महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन” आज दिनांक ०२ जानेवारी २०२६ रोजी पोलीस परेड मैदान, कोळगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आले होते. यावेळी विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर तसेच कुमार सुशांत, परिमंडळ सहायक पोलीस अधीक्षक हे मान्यवर उपस्थित होते.
सदर परेडचे संचलन समिर मेहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग यांनी केले. तर सेकंड कमांडर म्हणून संजय साबळे, रापोनि/पोलीस मुख्यालय, पालघर यांनी जबाबदारी सांभाळली.
या परेडमध्ये पोलीस मुख्यालय तसेच विविध पोलीस ठाण्यांतील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी आपल्या मनोगतात पालघर पोलीस दल सदैव नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असल्याचे सांगितले. समाजात शांतता, सुरक्षितता व विश्वास निर्माण करण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध असून सायबर गुन्हे, महिला व बालक सुरक्षा, वाहतूक शिस्त तसेच जनजागृती अभियानांबाबत नागरिकांनी सजग राहावे, असे आवाहन त्यांनी केले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी विनायक नरळे यांनी पालघर पोलीस दलाने वर्षभरात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा आढावा उपस्थितांसमोर मांडला.
हा संपूर्ण कार्यक्रम यतिश देशमुख व विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन समिर भोसले, पोलीस उपनिरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, पालघर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *